18/07/2026
शेंद्रा–बिडकीन ग्रीनफिल्ड महामार्ग : विकासाचा नवा कॉरिडॉर
महाराष्ट्र शासनाने २५ जून २०२६ रोजी राजपत्राद्वारे छत्रपती संभाजीनगर DMIC नोड-१ करमाड–बीडकीन (३२ किमी) आणि बीडकीन–ढोरेगाव (३५.८० किमी) असा एकूण ६७.८० किमी लांबीचा नवीन ग्रीनफिल्ड राज्य महामार्ग (राज्य महामार्ग क्र. ६१३) अधिसूचित केला आहे. या मार्गासाठी छत्रपती संभाजीनगर, गंगापूर आणि पैठण तालुक्यातील ४६ गावांमधील सुमारे ४४० हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे.
हा महामार्ग केवळ नवीन रस्ता नसून, छत्रपती संभाजीनगरच्या वाहतूक, उद्योग, लॉजिस्टिक्स आणि भविष्यातील शहरी विस्ताराचा पाया ठरू शकतो. शहरावरील वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार
आज मराठवाडा, विदर्भ, जालना, परभणी या भागातून पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली किंवा पश्चिम महाराष्ट्राकडे जाणारी बहुतांश वाहने छत्रपती संभाजीनगर शहर, बीड बायपास, एनएच-५२ आणि वाळूज मार्गे जातात. त्यामुळे शहरातील औद्योगिक आणि नागरी वाहतुकीवर मोठा ताण निर्माण होतो. नवीन ग्रीनफिल्ड महामार्गामुळे ही वाहने शहरात प्रवेश न करता थेट बिडकीनमार्गे पुण्याकडे वळतील. त्यामुळे शहरातील जड वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.
- वेळ आणि इंधनाची मोठी बचत
सध्या शेंद्रा किंवा वाळूज औद्योगिक क्षेत्रातून पुण्याकडे जाण्यासाठी शहराच्या बाहेर पडून बीड बायपासमार्गे एनएच-५२ पकडावा लागतो. हे अंतर 64 किमी असून, या प्रवासाला वाहतुकीनुसार किमान दोन तास लागू शकतात. ग्रीनफिल्ड महामार्ग सुरू झाल्यानंतर शेंद्रा करमाड परिसरातून पुणे महामार्गावर पोहोचण्याचे अंतर सुमारे ६८ किमी असून, हा प्रवास सुमारे एक तासात पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मालवाहतूक, उद्योग आणि प्रवाशांचा वेळ तसेच इंधनाची बचत होईल.
- छत्रपती संभाजीनगरसाठी बाह्य रिंगरोडची भूमिका
हा महामार्ग प्रत्यक्षात शहरासाठी Outer Ring Road प्रमाणे काम करेल.
शेंद्रा, बीडकीन, DMIC आणि AURIC परिसरातून विदर्भ, उत्तर भारत किंवा पूर्व भारताकडे जाणारी वाहने शहरात न येता थेट नवीन मार्ग वापरू शकतील. तसेच जड मालवाहतूक शहराबाहेर राहिल्याने वाहतूक कोंडी, प्रदूषण आणि अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.
- उद्योगांसाठी मोठा गेमचेंजर
शेंद्रा MIDC, ऑरिक शेंद्रा- बिडकीन, वाळूज एमआयडीसी आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर उद्योग येत आहेत. यामुळे हा शहराचा पूर्व-दक्षिण-पश्चिम परिसर उत्पादन केंद्र म्हणून विकसित होत आहे.
महामार्गामुळे उद्योगांना मिळणारे फायदे:
- पुणे व मुंबई बंदरांशी जलद संपर्क
- कंटेनर वाहतुकीचा कमी खर्च
- लॉजिस्टिक्स वेळेत घट
- निर्यातक्षम उद्योगांना चालना
- नवीन वेअरहाऊस आणि लॉजिस्टिक्स पार्क उभारणी
- ओपन ॲक्सेसमुळे रिअल इस्टेटला चालना
ग्रीनफिल्ड महामार्गाला योग्य ठिकाणी Open Access उपलब्ध झाल्यास महामार्गालगतच्या परिसराचा चेहरामोहरा बदलू शकतो.
यामुळे:
- नवीन निवासी टाउनशिप
- व्यावसायिक संकुले
- वेअरहाऊस
- लॉजिस्टिक्स हब
- फूड प्लाझा आणि पेट्रोल पंप
- MSME औद्योगिक पार्क
यांसारख्या प्रकल्पांना मोठी चालना मिळू शकते. विशेषतः शेंद्रा–बिडकीन दरम्यानचा पट्टा भविष्यात शहराच्या विस्ताराचा नवा विकास कॉरिडॉर बनू शकतो.
- निखिल भालेराव