20/06/2019
खपली
बाराचं लग्न एक वाजता लागलं आणि लग्नानंतर जेवणारांची एकच झुंबड उडाली..
आधीच उशीर,त्यात ऐन दुपारचं लग्न,उकाडा मरणाचा...हॉलमध्ये झालेली ही$$ गर्दी...
शरीराची अन मनाची झालेली घुसमट सोबत घेऊन तिनं घर गाठलं...
घरी आली...कुलरच्या थंड हवेत बसावं म्हणून बटण दाबलं... पण इथंही तिचं दुर्दैव आड आलं...
लाईट गायब...
ती स्वतःवरच चिडली...
आई पेपरने हवा घेत होती...
कसं झालं गं लग्न?...
जेवलीस का?...
काय होतं जेवायला?...
भेटलीस का नीता काकूंना?...
आईचे प्रश्नांवर प्रश्न सुरू होते....
तिच्या कानापर्यंत एकही प्रश्न पोचत नव्हता...
तिनं खुर्ची दरवाजाजवळ सरकवली आणि पुटठ्यानं वारा घेऊ लागली....
सोनू,निताचा जावई कसा आहे गं?...
रसिका छान दिसत असेल ना गं?..
आई,जरा गप्प बसायला काय घेशील?...
अजिबात बोलू नकोस आणि काही विचारू पण नकोस...
मला थोडा वेळ शांत बसू देत...
बिचारी आई हिरमुसली होऊन तिथून निघून गेली...
ती अस्वस्थ झाली...
आईवर विनाकारण ओरडलो याचं वाईट वाटलं तिला..
साडी बदलून,हातपाय धुवून तिनं दोन तीन ग्लास पाणी पिलं...
थोडंसं बरं वाटलं तिला..
मन मात्र अशांतच होतं तिचं..
दरवाजासमोर चटई टाकली आणि थोडी आडवी झाली..
आजकाल कुठंच जायला नकोसं वाटायचं..
बरोबरीच्या मैत्रिणी लग्न होऊन आपापल्या घरी गेलेल्या..
घरी जीव उबगायचा..
काम काम तरी किती करायचं?..
त्याचा पण कंटाळा यायचा..
छंद असा नव्हताच की ज्यात मन रमेल..
बसून बसून वजन वाढलं होतं..
आज आई अगदी खनपटीला बसली म्हणून रसिकाच्या लग्नाला गेली..
पण आता तिला वाटायला लागलं की नसते गेले तर बरं झालं असतं...
लग्न लागलं...गिफ्ट देण्यासाठी ती स्टेजकडं निघाली..
तिथंही भरपूर गर्दी होती...
भेटणारांची रांग लागली होती..
त्यातच तिला तो दिसला...
आधी तिचा विश्वासच बसेना..
पण नीट लक्ष देऊन पाहिलं..
हो,तोच होता..खांद्यावर मुलीला घेतलं होतं..
सोबत बायको...
छान होती बायको..
अगदी आनंदात दिसत होते दोघेही..
स्टेजवरुन उतरताना त्यानं तिचा हात धरला.. अन हिच्या काळजात कळ आली..
तिथं थांबणं शक्यच नव्हतं आता..
नवरीला न भेटताच निघाली ती परत...
खरं तर त्याच्या बरोबर आज मी असते..
आमचंही असं गोडुलं बाळ असतं...
पण...
नव्हतं माझ्या नशिबात...
नव्हतं?..
होतं...
मीच नतद्रष्ट...
घालवलं... सगळं...
माझ्या हातानं घालवलं..
लाथाडलं सुखाला..
एकुलता एक मुलगा पाहून थाटामाटात लग्न करून दिलं घरच्यांनी...
मी लाडकी बाबांची....बाबा माझ्यासाठी माझे हिरो..
ते म्हणतील ते चांगलेच ही माझी खात्री...
भावापेक्षा त्यांचं माझ्यावर जास्त प्रेम..
हे जास्तीचं प्रेम एक दिवस माझं सुख ओरबाडेल असं वाटलंच नाही...
सासरची माणसं साधी होती...
मी शहरातली...या छोट्या गावात मला तितकं करमायचं नाही..
खरं तर माझा लाड इतका होता की,बाबांची ताकीदच होती आई आणि आजीला की मला कुठलंच काम नाही सांगायचं..
त्यामुळं मला कुठलंच काम धडपणे येत नव्हतं..
त्यात बाबांनी सासरच्या लोकांना सांगितलं होतं की मला मुलीची खुशाली रोज समजायला हवी..
मग काय..त्यांचा दिवसातून दोन वेळा फोन यायचा..
जेवलीस का?..काय काम केलंस?..करमतं का?..
मग मला खरंच नाही करमायचं...
मी सारखा हट्ट करत रहायचे माहेरी जायचा..
सुरुवातीला पुरवला गेला माझा हट्ट..
नवीन आहे,रुळायला वेळ लागेल म्हणून पाठवत माहेरी..
पण नंतर ...जाऊ नको म्हणायचे...
काही कारण असेल तरच जा,सारखं जाणं बरं नाही असं म्हटलं की मी हट्टाला पेटायचे..
जायचंच म्हणायचे...
मग भांडण सुरू व्हायचं..
बाबा खतपाणी घालायचे...
नवरा साधा होता..पण तो कंटाळला सततच्या तक्रारींना..
माझ्या मनासारखं माहेरी घडायचं.. इथंही घडावं हा माझा अट्टाहास होता..
तो पुरा होईना..
बाबा म्हणाले ये इकडं निघून..
आले...
खूप दिवस गेलेच नाही..
नवरा न्यायला आला...
बाबांनी वेगळं रहायची अट घातली..
त्यानं मानली नाही..
तो परत गेला...
आजीनं मला आणि बाबांना खूप समजावलं...
मला आजीचं पटलं,पण बाबा म्हणाले असं कसं?..
मग माझ्या मताला काही किंमत आहे की नाही?...
कसंतरी त्यांना आईनं तयार केलं आणि मला पोचवलं सासरी..
काही दिवस बरे गेले..सगळे माझ्या कलानं वागत होते..
एक दिवस पुन्हा काहीतरी क्षुल्लक कारणावरून आमचा वाद झाला..
मी माहेर गाठलं..
मनात राग होताच..
बाबांना जरा जास्तच तिखटमीठ लावून भांडण झाल्याचं सांगितलं...
मग डायरेक्ट ४९८ दाखल केली सगळ्यांवर...
चार वर्षे केस चालली..
आधी सर्वांची सहानुभूती मिळाली...
हळूहळू नातेवाईक दूर झाले...
बाबांचा स्वभाव माहिती होता..
मला पण कंटाळा येऊ लागला होता कोर्ट,जबाब यांचा..
अखेरीस दोन्हीकडच्या संमतीने आमचा घटस्फोट झाला...
इतकं ताणलं की शेवटी तुटलं नातं..
घटस्फोट झाला त्या दिवशी मी खूप रडले..
मला काय हवं होतं हेच समजत नव्हतं मला...
बाबांना मात्र जग जिंकल्या सारखं वाटलं..
लग्नाच्या खर्चाबद्दल मिळालेले पैसे हातात घेऊन वेड्यासारखे हसत होते ते..
दिवसांमागून दिवस गेले..
परदुःख शीतल असतं... सगळे आपापल्या उद्योगाला लागले...
माझ्यावरचं लक्ष हळूहळू कमी झालं...
मी मात्र आतून तुटत गेले...
एक दिवस अचानक हार्ट ऍटॅक येऊन बाबा गेले...
माझा भक्कम पाठींबा गेला..
सतत घरात राहून माझं वजन वाढत चाललं..
कुठंच जाणं येणं नसल्यामुळं बाहेरच्या जगाशी संबंध तुटल्यासारखं झालं...
आज कितीतरी दिवसांनी बाहेर पडले...
आणि मीच मला केलेल्या जखमेची खपली उघडी पडली..
कधीही न भरून येणारी..
सौ.सुतेजा फडके
वाशीम
२० जून २०१९